करुनी नामस्मरण;जणू स्वभोवती शिंपण
केले जैसे प्रोक्षण;आंत नारायण केवळ।
करुनी मजसि जवळ;खेचलेसे वर्तुळ
आंत त्याचे अस्तिवं केवळ;तेज सकळ साचलेसे।
आंत असे तेजाचा प्रभाव;नसे मायेचा रिघाव
नामें ऐसा होईल भांव;विठ्टल घेईल ठांव अंतरीचा।
करुनी नामस्मरण;जणू स्वभोवती शिंपण
केले जैसे प्रोक्षण;आंत नारायण केवळ।
करुनी मजसि जवळ;खेचलेसे वर्तुळ
आंत त्याचे अस्तिवं केवळ;तेज सकळ साचलेसे।
आंत असे तेजाचा प्रभाव;नसे मायेचा रिघाव
नामें ऐसा होईल भांव;विठ्टल घेईल ठांव अंतरीचा।
मुरडोनि मन मागे फिरले। चैतन्याठायि एकवटले।
आता कैचे परतोनि फिरणे। आता चैतन्याठायि राहणे।
जणू निश्वास मागे फिरला। भरुनी श्वासापाशी ऊरला।
ऊरला श्वास तो ही सरला। न द्वैतभाव ऊरला।
मोडिली मायेची भ्रांती। मज भेटला तो एकान्ति।
देऊनि आपुला कर हाती। दिली प्रचिती ब्रम्हत्वाचि।
तिच्या गालावरील तिळाचा अर्थ ईश्वराने मज काल सांगितला..
इथेच संपते सौंदर्य म्हणून त्याने पूर्णविराम दिला..
वागताना इतरांसारखे स्वत:स हरवूं लागलो
भेटेल जो तयास ऒळख माझी पुसूं लागलो..
जोडिली मी भोवताली वर्तुळात एका माणसे
मधे मात्र पुरता मीच अडकूनी गेलो ..
ऊचलली स्तुतीच्या भोयांनी माझ्या अहंकाराची पालखी..
माझाच पत्ता मूळचा भोयास मी विचारु लागलो..
नाहू घालतां इतरांस आनंदात ठेविली मी पायरीवर दु:खे
बंद दार होताच त्यांचे दु:खात माझ्या भिजूं लागलो...
वैजयंतीच्या टेकडीवर मी एकटाच गेलो.एक घरटं दिसलं पानाच्या जाळीत.रिकामं.पाखरं ऊडून गेलेली.ते अलगद हातीं घेतलं.काही नुकतीच गळालेली पानंही ऊचलून हाती घेतली...घरी आलो.वैदेहीस न दाखवतां कपाटात ठेवलं...
दुसरा दिवस चाफ्याच्या सुगंधात नाहलेला...
मी वैदेहीस बोलावलं.ती आली.जवळच बसली.तिला डोळे मिटायला सांगितलं..माझ्या हातीं होतं पानांच्या आंत शिवलेलं घरटं! जे रात्री मी शिवलेलं.
तिला डोळे उघडायला सांगून मी ते तिच्या हातीं दिलं..तिचे सुंदर डोळे आश्चर्यानं मोठे झाले.चेहर्यावर आरक्तवर्णाची पावलं हलकेच उमटून गेली...
मी म्हणालो.," ते कानापाशी धर." तिनं तसं केलं.
"वारं सुटल्यावर येतो तसा आवाज पानांच्या पोकळीतून येतोय मंदसा " ती म्हणाली..मी तिच्याकडं पहात म्हणलं.,"तो श्वासाचा आवाज आहे वैदेही! शब्दांनी किती धांवायचं तुझ्यामागं.." असं म्हणत मी घरटं माझ्या हातीं घेतलं.वरुन पानं हलकेच उलगडली..आणि तिला पहायला सांगितलं..आंतल्या घरट्यात मऊ कापूस होता.त्यावर काही कागदांचे तुकडे..!तिनं ते वेचून घेतले...प्रत्येक कागदावर एकेक शब्द होता...!!
समजाविती लोक मजला
देतील त्रास तुज वैदेहीची स्वप्ने
परि व्यदतो व्याघात हा
येते कुठे नशा अमृताने...
एखाद्या गोष्टीस गतीमुळं वस्तुमान प्राप्त होतं.वस्तुमान भोवतालचं अवकाशही वक्र करतं.आईनस्टाईनचा 'सापेक्षतावाद' हेच सांगतो..
विषय वासनांकडील गती ही मनास जडत्वं प्रदान करते का.? देह नामक वस्तुमानाशी मन म्हणून बांधलं जातं का.? अवकाशाचं वक्रिभवन होऊन जणू आपलं या पृथ्वीतलावर येणं होतं का.? व या बद्धतेतून बाहेर पडून मुक्त व्हावं असं वाटतं का.?...
कदाचित आपण मुळात मुक्त आहोत.त्यामुळंच मुक्तीची आंस अंतरी आहे.सगळी शक्ति मूलाधारापाशी पडून राहते.मग भोगकेंद्रित जीवनप्रणाली सुरु होते..उर्ध्वदिशेने ती प्रवाहित तेव्हा होते जेव्हा मुक्तीकडे जावेसे वाटते..स्थूलाकडून सुक्ष्मतेकडे व सुक्ष्मतेकडून मूळ अवस्थेत ती विलिन होते.
अणूमधे पॉझिटिव्ह;निगेटिव्ह भाराचे प्रोटॉन;ईलेक्ट्रॉन व उदासिन न्यूट्रॉन असतात.आपलं मनही तसंच समाज मनही. म्हणून एखाद्या घटनेबाबत समर्थन;विरोध;उदासिनता सारं दिसतं..
आपण खरंतर पॉझिटिव्हही नाही ;निगेटिव्हही नाही उदासिनही नाही.विषयाकडील गती;घटनेची वक्रता यावरुन कल ठरतो..व जडत्वं प्रदान होतं इतकंच.! आपण त्या पलिकडे आहोत..
'सापेक्षवादा'नुसार सारे एकमेकांच्या आधारी ऊभे.व्याख्याही..पॉझिटिव्ह काय? तर जे निगेटिव्ह नाही ते..!जे दोन्ही नाही ते उदासिन...!
गीतेमधील स्थितप्रद्न्यता म्हणजे या पलिकडे जाणे..आपण मुळातच पृथक आहोत..
अनंतावस्था अणूच्या संसारात बद्घ होते..!अणूच्या सर्व गुणांच्या पलिकडं आपलं मूळ रुप..!!
अनंत.! अणूच्या एका गुणानं 'भारुन' त्याच्याशी तादात्म्य व्हायचं..हसायचं रडायचं उदास व्हायचं...मग ईश्वर स्पर्श करतो. म्हणतो,"..कुठं हरवलास..?" मग 'स्व'ची जाणिव होते...!व त्याच्या स्पर्शाने त्याच्यातच विरघळून जाणं घडतं..!आपण अनंत आहोत हे जाणायलाही पृथकत्वं उरत नाही...!तिच मुक्ति...!!
रक्ताच्याच माणसांनी दोष अखेरी
प्रारब्धास त्यांच्याच दिले
जिवंत होतो आम्ही येथे जरी
घांव मनापासूनी त्यांनी घातले
नाही करणार प्रतारणा कधीच
करार मी श्वासांसी केला
करुन किव' त्यांनी' माझी
पहारा श्वासावर बसविला
माझ्याचसाठीची भिक्षाही
त्यांनीच लुटली
बाजारात कालच्या
माझी झोळीही विकली...
दयावे दोष मलाच सांगूनी मी
केले लोकांना चौकटीतून मोकळे
मी असाच आहे;तसाच आहे म्हणूनी
घेतले आत्ताच त्यांनी श्वास मोकळे
सद्गुणांचे ऒझे माझ्या
जड त्यांना वाटूं लागले
मारलेले बाणही त्यांनी
मागून पुन्हा घेतले
घालूनी घांव अंति
त्यांचे डोळे पाणावले
तुझ्यामुळेच म्हणाले
आमचे शस्त्र बोथट झाले
प्रेतयात्रेस माझ्या
त्यांनी लाविल्या रांगा
होता माणूस बरा
हे ही म्हणून घेतले..
'प्यासा' चित्रपटात शेवटी गुरुदत्त वहिदा रेहमानला म्हणतो .."दूर निघून जाणार आहे मी..येतेस बरोबर.?" त्या आधीचे त्याचे संवाद प्रत्येक संवेदनशील कलाकाराच्या मन:स्थितीचं प्रातिनिधित्व करतात. ज्याला कला'विकायला'जमली;नव्हे ज्यांना जे विकलं जातं ते जन्मास घालायला जमलंय त्यांसाठी ते नाहीत...
खरं प्रेम नशिबाची गोष्ट.!मला अलिकडे सल्ल्यांचं भय आहे.एखाद्या ब्रेनट्यूमर झालेल्या व्यक्तिस तो नुसता कण्हला तर केवळ फ्लूचा अनुभव असलेल्यानं त्याच्याकडे किंव करुन उपहासानं हसावं.असं या जगात चालतं."जग असंच असतं.असंच जगायला लागतं..अमूक;तमूक..!!"असे अनेक सल्ले.भोगण्याचा माझा अहंकार वाटेल कुणाला म्हणून वाटतं मौन रहावं.
इथं कपड्यांवरुन ऒळख ठरते.पायातल्या चपलांवरुन लायकी.गाडी धर्म झाली.बंगला प्राण..! जे पैसे देऊन आणलं त्यांस किंमत..काळजीस किंमत नाही.स्पंदनांना नाही..!पैशाच्या खणखणाटात वृद्ध आईचं कण्हणं ऐकू येत नाही.छोटेखानी घर;गरजेपुरती गाडी..इथं थांबणं होत नाही.मग गरजाही मोठ्या होऊ लागतात.मर्सिडिझ गरज होते.जिथं सेलिब्रिटी आदर्श होतात.तिथं मूल्य ऊतरतीस लागतात.ऊंच घरं इतक्याचसाठी घ्यायची कुणाची नजर पोचू नये..पण आंतील दुश्वासाचे सूर बाहेर पडू नये हे कारण कुणी जाणत नाही..पैसा;अधिकारांचं राज्य सगळीकडे.दुसर्याची उपेक्षा.!कला;गुण;नितीमत्तेपेक्षा पैसा श्रेष्ठ..!
सागराची गाज 'पार्ट्यांच्या' आवाजात ऐकूं येत नाही.पाऊसधारा;धुकं हा अनुभव राहिला नाही.कला अनुभव अन् अनुभूती प्रदान करते.पण लोकांना ते नकोय...जे उपयुक्त आहे ते सारं जपतील कारण पैसे मोजलेत..!अशीच लोकं जास्त..
हृदयाची धांव असमर्थतेपर्यंत..तेथून चलाख मेंदूंचं राज्य..!जगण्यासाठी दोहोंचा समन्वय हवा..पण चलाख मेंदूनं 'खटला'जिंकलाय....!
थांबावं;वाटतं यावरही कुणी सल्ला देईल...!
निष्पर्ण वृक्षावरी माझ्या
इतुकी पाखरे बसावी
पायतळीची पानगळ
वृक्षावरी रुसावी..
छेडताना तानपुरा मी
अवचितसे रक्त वहावे
अन् गात्रातूनी माझिया
गाणी गंधाराची सजावी..
ऒहोटलेले पाहूनी प्रेम
चंद्राच्या डोळा पाणी यावे
आवेग लाटांचा पाहूनी
किनार्यास भरती यावी..
ऐसे मज भाग्य देऊनी
कृष्णाच्या गाली स्मित यावे
डोळ्यातल्या आसवांनी
त्याचीच बासरी भिजावी...
मी वैदेहीस म्हणलं..,"तू आसमंत माझं..!अव्यक्त..!अनंत.!अन् माझी ऒंजळ मात्र लहान..तुझं माझ्या जीवनी असणं ही केवळ त्या योगेश्वराची खेळी..!माझी इतकी योग्यता नाही.....
बघितलंस..?स्तुतीच्या एका शब्दाचाही तुजला भार होतो..अन् लोचने लज्जेनं खाली झुकतात..तुझ्यामुळे शब्दांना गेयता येते अन् क्रियापदाचं कुंपण कागदात घट्ट रोवून राहतं..आधीचे सारे शब्द मोहक वळणे घेतात; त्यांचं काव्य बनतं...!
तिनं हे ऐकून स्मित केलं..तिनं माझा हात हाती घेतला व म्हणाली;"दोन हातांवरील रेषांत साम्य नसतं पण साम्य स्थळं असतात.."असं म्हणून तिनं पेनानं माझ्या हातावरील काही रेषा गडद केल्या..मला आकाशाकडं पहायला लावून.!मग म्हणाली.,"दूर दूरचे तारे आपण सुंदर नक्षत्रात गुंफतो..तसं काहीसं.!.प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त असतंच.,उणीवा असतात.वेगळेपण वगळता येत नाही..मग काय करायचं.?त्याला महत्वंच द्यायचं नाही..मग तुलना नाही.दिसत राहते ती एकमेकांमधील समानता.त्यामुळे यानंतर अस्तित्वात असेल ते केवळ साम्य..!"असं म्हणत तिनं तिचाही तळहात माझ्या तळहातास जोडला व मला ते पहायला सांगितलं..तिनं तिच्याही हातावरच्या साम्यरेषा गडद केल्या होत्या...!!आणि दोहोंच्या मिलाफातून मोरपिस तयार झालेलं होतं..!!
मी तिला आसमंत म्हणतो ते उगीच नाही.!!
अनन्यसाधारण वेग प्रकाशाचा असून एखाद्या ग्रहापासूनचे;तार्यापासूनचे अंतर दर्शविण्यासाठी अजूनही प्रकाशाचे परिमाण वापरले जाते.याचं कारण लाखो किलोमिटर प्रवास करुन प्रकाश हा "प्रकाशच"राहतो.त्याचं वस्तुमानात परिवर्तन होत नाही.आईन्टाईनने हे सिद्घ केलेले आहे.
मला वाटतं आज मनुष्य गतिमान झाला.सूक्ष्म द्रव्यापरि असलेलं त्याचं मनही गतिमान झालं.एखादी गोष्ट वस्तुमानात परिवर्तीत झाली की त्याला वस्तुमानाचे गुण लागू होतात.मनुष्याचं चैतन्यापाशी असणं.. सूक्ष्म;तरल मनाच्या पातळीवर असणं कमी होतं चाललं.जड देहाशी मनाची नाळ जुळली.त्यामुळे कदाचित गतिमान मन हे वस्तुमानाप्रमाणे "जड" होत गेलं.वस्तुमानाचे गुण त्यात दिसूं लागले.परिणामी मनुष्य भावनाहिन झाला...संवेदना लोप पावली..पाषाणापरि बनून गेला.कारण ईतुकेच की तो गतिमान झाला....
गतिमान होऊनही जो चैतन्यापाशी उरला तो कलाकार;कलासक्त;शास्त्रद्न्य झाला..व जो चैतन्यची केवळ राहिला तो संतत्वात विलिन जाहला......!
वैदेहीस...
आठवतं तुला..? तू काही क्षण दूर गेलीस..अन् माझं मन आवेगी झालं..कागदावरची रेषा त्याच आवेगानं जन्मास आली..विलक्षण गतीनं...जी कागद सोडून बाहेर जाऊन परतली.कागदावर ऊतरली खरी पण नंतरचा प्रवास थांबलाच जणू तिचा..
शेवटी मी बाहेर पाहिलं..आसमंतीच्या एका मेघास गुंफून घेऊन ती परतली होती.अन् म्हणून त्या मेघाचाही प्रवास थांबलेला..मी रेषेस सोडवून घेतलं..मेघास जायला सांगितलं.पण तो थांबला..म्हणला;."हा बंध बांधला गेला त्याला कारण असावं;काय घडलंय सांग मला.."अन् मी त्याला सारं सांगितलं..मन भरुन येत गेलं त्याचंही.!
म्हणाला;" माझ्यावर चित्रं रंगव..किंवा..लिही एखादा निरोप तिच्यासाठी.!"मी मौन होतो ऊदास होतो..तुझ्यासाठीच्या भावनाही अव्यक्त होत्या.म्हणून मी त्याच्यावर एक 'स्वल्पविराम' लिहीला...तो निघून गेला...
तुझा प्रदेश त्याला लागला..तू मेघ पाहिलास..क्षणभर प्रश्नचिन्ह दाटलं तुझ्या चेहेर्यावर..मग चेहरा निवळला तुझा.तू मेघास विचारलंस."मेघा तू अल्प;स्वल्पसा विश्राम कुठे केलास.?त्या चित्रकाराकडं तर नव्हे.?इतर मेघ तसेेच परतले कोरे.मात्र तुझ्यावर स्वल्पविराम आहे..!"
मेघास कळले हाच पूर्णविराम आपल्या प्रवासाचा..त्यानं तुला चिंब भिजविले..व तो रिता झाला..अन्
तू त्या वेळी मात्र माझ्या मनातल्या वियोगाचा आर्त सागर पेललास.....!!
मी तुझा कसा ऊतराई होऊ.?कारण तू धावत आलीस..कवितेमधून नांदू लागलीस....
वैदेही तुझ्यासमोर शब्द पांगळे आहेत.सगळे कसे समुहानं येतात एकमेकांचा हात पकडून..वरच्या रेषेचा आधार घेऊन ऊभे राहतात..मी मनापासून जाणतो तू त्यांना कौतुकानं ऒंजळीत घेतेस ..मग माझं न ऐकता एखादा चुकार शब्द तुझ्या ऒंजळीत ऊडी मारतो..तुझ्या कोमल स्पर्शानं त्यांना कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं.तू काय आहेस; कोण आहेस....................हे सांगायला एकतरी शब्दं सामोरा आला का पहा..!मौन होतो मी..
तू माझं काव्य ..तूच कथा..तू नसलीस की शब्द रुसतात मजवर..कितीही बोलवलं तरी ज्यांचं काम नाही त्याना पाठवतात...
तुला पाहण्यासाठी चांदणं चंद्रापासूनचा लांबचा प्रवास करतं.ते तुझ्या स्पर्शासाठी धडपडतं..ते अंगणी ऊतरतं.खिडकीतून आतही...तुझ्यासाठी त्याचं कसं हे धाडस...!!
एक विनवितो तुला; तू चांदण्यात येऊ नकोस..तू खोटा म्हणून त्या आकाशीच्या चंद्राशी मला वाद घालायचा नाहीए..वारा हलकेच तुला स्पर्शेल तेव्हा भान असूदेे.. तुझ्याकडे पाहणारे सारे लता;वृक्ष;नदी तुझ्याशी तादात्म्य होतात..तेही शहारतील याचं स्मरण असूदे..तुझ्याच श्वास निश्वासाच्या बंदिशीवर सारे चराचर डोलते..तुझ्याचसाठी प्राजक्तफूल बरसते..तुझ्या स्पर्शानं देठांचे रंग त्यांच्या गहिरे होतात..गुंफून फुलांना जेव्हा तू केसात माळतेस...आकाशगंगा लेवून ऊभे आसमंत भासतेस..!!
तुझाच..
पराग
कसे समजाऊ सांग कवितेला
तिला आहे तुजकडे यायचे..
अजूनही ताजे रंग नव्हाळीचे
हे वयही नाही तिने बाहेर जायचे...