Saturday, July 16, 2016
Saturday, May 14, 2016
आज..
पेटवूनी घरे आपुलीच चालले हे कुणाचे समर्थक
धुंदीत चालले घालीत आपुल्याच पावलास धाक
विकट हास्य करुनी नेते यांचे पाहती दुरुनी
वांझ करुनी वंशजांचा बदलती ललाटीचा लेख
जातियतेचे मद्य वाटले यांनी तरुण रक्तात
कालची पोरे आज लाविती आईच्या गळ्यास नख
वळूनी पुन्हा येऊनी यांनी मंदिरे पुन्हा भग्न केली
करण्यास अपशकून कापले जसे स्वत:चे नाक
नपुंसकता लपविण्या लाविले महापुरुषांचे टिळे
दिली भिरकाऊनी आसमंती क्रांतीविरांची राख....
Wednesday, April 6, 2016
Thursday, March 17, 2016
ती...
पाहिले तिने अशा नजरेने
छेडिली गेली तार मनाची
तेव्हापासूनी ठोका काळजाचा
माझा लयीत नाही ...
कैफात सुरांच्या
ताल वहावत जाई
मैफिल वेगळी अशी
कधी ऐकलीच नाही ..
घेतले जे पाऊल पुड्हे
घेऊ कसे मागे मी..
माझ्या पावलांना
नशेचा अनुभव नाही..
Monday, March 14, 2016
तोच पुन्हा ..
त्या प्राणसख्यास मी म्हणालो "कृष्णा;जाण्यापूर्वी थोडासा काळ तुजसमिप व्यतीत करावा ही मनिषा आहे. इतकं तरी करशील नं..?"
तो मंदपणे हसला..मान हलकेच हलवून त्यानं अनुमोदन दिलं ..मी नंतर म्हणालो "तुला चराचरात व्याप्त मल़ा अनुभवायचंय..शब्दानं मौन राहून ..! ही अवघी सृष्टी जी संवाद करते ते ऐकायचंय..तुझ्या सहवासात..!"
यावरही तो हसला."पण एक वचन दे."मी म्हणालो.."माझ्या मनांतरीच्या गाभारीं तू डोकवायचं नाहीस ..मला एकट्यासच अनुभवूदे सारं "
"ठिक आहे ..!" तो मृदूतेनं म्हणाला ..आम्ही दोघंही त्या यमुनातटी चालत राहिलो ..त्यानं आपले हात मागं गुंफले एकमेकांत..! अन् तो सवे चालू लागला ..संध्या उतरु लागली.. नभीचा नंदादिप तो चंद्र ऊजळून गेला..!
रात्र सुखावली त्या मेघश्यामाचं रुप पाहून..चांदण्यास तिनं मनापासून धन्यवाद दिले.कारण एरवी चंद्र नसता त्या निलकांती वर्ण ल्यालेल्या कृष्णास तिला शोधावं लागे ..! तो सहजची अनंतात मिसळून जायचा ..! त्यानं जेव्हा मंदपणे हास्य केलं तेव्हा त्याचे मोत्यासारख्या दंतपंक्ती झळाळून गेल्या क्षणभर..कालिंदीचं पाणीही..!
तटावरील मऊ मुलायम रेतीनं रक्तिमवर्णि त्याच्या करकमलास घट्ट कवळिले होते. अन् त्याच्या पाऊलखुणांवर कोणी वृक्षानं फूल अर्पियले होते..!!
Sunday, March 13, 2016
तो...प्राणसखा..
त्या केशवाचा अगदी पळभरासाठी निरोप घेतला मी..त्या कालिंदी तटीच्या कदंबवृक्षातळीं.त्याचे ते मृदू निलवर्णी हात मजहाती होते ..संध्या आरक्त होती ..अन् तो आदित्य रेंगाळलेला..पळभराचा विरह कुणासाठी सुखावह नव्हता .."तुला कार्य करायचं आहे ;कर्तव्य धर्म पाळायचा आहे. हे करताना मी सतत तुझ्यासवें असेनच..मग तू माझ्या ठायी विलिन होशील.." इतकंच तो बोलला.परंतु ते शब्द विरहाचे दूत ठरले जणू ..त्यानं आश्वासक असं स्मित केलं..मन म्हणालं 'कृष्णा नको न रे असा जीवघेणा खेळ करु..निरोप देता देता बांधणारं तुझं हसू ..!' पण ही खेळी तोच करु जाणे ..मी दूर जाऊ नये म्हणून त्या स्मित हास्याचे बंध बांधण्याची खेळी..
शीत मधुर वा-याच्या लहरीं त्याच्या मोरपिंसाच्या एकेक "तारेस "छेडून जात होत्या. अन् त्या तटावरील निशब्द शांततेत मालकंसाचे सूर उमटत होते..!
Wednesday, March 9, 2016
वैदेहीस..
वैदेहीस..
गूज प्रितीचे तव बटेने
सांगितले अखेरी..व्यक्त शब्दात अधुरेपण
अव्यक्तात माधुरी..
सांग पाहिलेस का कधी तू काव्य
जे रेखीले मी तुझ्या प्रियेच्या गालावरी....!!
Saturday, February 13, 2016
प्रेम ..
प्रेम ...!
जे शब्दातून व्यक्त झालं नाही कधीही ते प्रेम ..शब्दांनी फक्त त्या अव्यक्ताची संकल्पना मांडली..पण ते शब्द म्हणजेच प्रेम नव्हे. त्याला नव्हतं काळाचं बंधन ना दिवसाचं..मौनही पुरेसं बोलकं ठरवतं प्रेम..अनंत त्याची व्याप्ती..ते या कुडीतून व्यक्त व्हायचं तरी कसं..?? ज्याला ते कळालं तो मौन झाला..समुद्र फक्त अनुभवायचा असतो हे त्याला कळालं ..शब्द त्यात विलिन होतात जणू ..!
सागर तटावर " तो " काहीच बोलत नाही तेव्हा "तिला "आश्चर्य वाटतं ..तो रेतीवर वेड्यावाकड्या रेघा उमटवत राहतो.. ते असह्य होऊन ती त्याचा हात धरते..म्हणते बोल काही ..तरीही तो स्मित करतो ;पुन्हा मौन होतो ..तिला ते कायम वेडेपण वाटत राहतं ..मग एके दिवशी त्या अव्यक्ततेची अनुभूती तिला होते..त्याच्या त्या रेषांना अर्थ प्राप्त होतो. ..
शब्दात व्यक्त न होऊ पाहणारं प्रेम हाताद्वारे असमर्थता दाखवत होतं ..!!