त्या प्राणसख्यास मी म्हणालो "कृष्णा;जाण्यापूर्वी थोडासा काळ तुजसमिप व्यतीत करावा ही मनिषा आहे. इतकं तरी करशील नं..?"
तो मंदपणे हसला..मान हलकेच हलवून त्यानं अनुमोदन दिलं ..मी नंतर म्हणालो "तुला चराचरात व्याप्त मल़ा अनुभवायचंय..शब्दानं मौन राहून ..! ही अवघी सृष्टी जी संवाद करते ते ऐकायचंय..तुझ्या सहवासात..!"
यावरही तो हसला."पण एक वचन दे."मी म्हणालो.."माझ्या मनांतरीच्या गाभारीं तू डोकवायचं नाहीस ..मला एकट्यासच अनुभवूदे सारं "
"ठिक आहे ..!" तो मृदूतेनं म्हणाला ..आम्ही दोघंही त्या यमुनातटी चालत राहिलो ..त्यानं आपले हात मागं गुंफले एकमेकांत..! अन् तो सवे चालू लागला ..संध्या उतरु लागली.. नभीचा नंदादिप तो चंद्र ऊजळून गेला..!
रात्र सुखावली त्या मेघश्यामाचं रुप पाहून..चांदण्यास तिनं मनापासून धन्यवाद दिले.कारण एरवी चंद्र नसता त्या निलकांती वर्ण ल्यालेल्या कृष्णास तिला शोधावं लागे ..! तो सहजची अनंतात मिसळून जायचा ..! त्यानं जेव्हा मंदपणे हास्य केलं तेव्हा त्याचे मोत्यासारख्या दंतपंक्ती झळाळून गेल्या क्षणभर..कालिंदीचं पाणीही..!
तटावरील मऊ मुलायम रेतीनं रक्तिमवर्णि त्याच्या करकमलास घट्ट कवळिले होते. अन् त्याच्या पाऊलखुणांवर कोणी वृक्षानं फूल अर्पियले होते..!!
Monday, March 14, 2016
तोच पुन्हा ..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment