Tuesday, September 24, 2013
Sunday, September 15, 2013
Sunday, September 8, 2013
माझंही एक मेघदूत..
वैदेहीस...
आठवतं तुला..? तू काही क्षण दूर गेलीस..अन् माझं मन आवेगी झालं..कागदावरची रेषा त्याच आवेगानं जन्मास आली..विलक्षण गतीनं...जी कागद सोडून बाहेर जाऊन परतली.कागदावर ऊतरली खरी पण नंतरचा प्रवास थांबलाच जणू तिचा..
शेवटी मी बाहेर पाहिलं..आसमंतीच्या एका मेघास गुंफून घेऊन ती परतली होती.अन् म्हणून त्या मेघाचाही प्रवास थांबलेला..मी रेषेस सोडवून घेतलं..मेघास जायला सांगितलं.पण तो थांबला..म्हणला;."हा बंध बांधला गेला त्याला कारण असावं;काय घडलंय सांग मला.."अन् मी त्याला सारं सांगितलं..मन भरुन येत गेलं त्याचंही.!
म्हणाला;" माझ्यावर चित्रं रंगव..किंवा..लिही एखादा निरोप तिच्यासाठी.!"मी मौन होतो ऊदास होतो..तुझ्यासाठीच्या भावनाही अव्यक्त होत्या.म्हणून मी त्याच्यावर एक 'स्वल्पविराम' लिहीला...तो निघून गेला...
तुझा प्रदेश त्याला लागला..तू मेघ पाहिलास..क्षणभर प्रश्नचिन्ह दाटलं तुझ्या चेहेर्यावर..मग चेहरा निवळला तुझा.तू मेघास विचारलंस."मेघा तू अल्प;स्वल्पसा विश्राम कुठे केलास.?त्या चित्रकाराकडं तर नव्हे.?इतर मेघ तसेेच परतले कोरे.मात्र तुझ्यावर स्वल्पविराम आहे..!"
मेघास कळले हाच पूर्णविराम आपल्या प्रवासाचा..त्यानं तुला चिंब भिजविले..व तो रिता झाला..अन्
तू त्या वेळी मात्र माझ्या मनातल्या वियोगाचा आर्त सागर पेललास.....!!
मी तुझा कसा ऊतराई होऊ.?कारण तू धावत आलीस..कवितेमधून नांदू लागलीस....
Friday, September 6, 2013
वैदेहीस माझं पत्रं...
वैदेही तुझ्यासमोर शब्द पांगळे आहेत.सगळे कसे समुहानं येतात एकमेकांचा हात पकडून..वरच्या रेषेचा आधार घेऊन ऊभे राहतात..मी मनापासून जाणतो तू त्यांना कौतुकानं ऒंजळीत घेतेस ..मग माझं न ऐकता एखादा चुकार शब्द तुझ्या ऒंजळीत ऊडी मारतो..तुझ्या कोमल स्पर्शानं त्यांना कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं.तू काय आहेस; कोण आहेस....................हे सांगायला एकतरी शब्दं सामोरा आला का पहा..!मौन होतो मी..
तू माझं काव्य ..तूच कथा..तू नसलीस की शब्द रुसतात मजवर..कितीही बोलवलं तरी ज्यांचं काम नाही त्याना पाठवतात...
तुला पाहण्यासाठी चांदणं चंद्रापासूनचा लांबचा प्रवास करतं.ते तुझ्या स्पर्शासाठी धडपडतं..ते अंगणी ऊतरतं.खिडकीतून आतही...तुझ्यासाठी त्याचं कसं हे धाडस...!!
एक विनवितो तुला; तू चांदण्यात येऊ नकोस..तू खोटा म्हणून त्या आकाशीच्या चंद्राशी मला वाद घालायचा नाहीए..वारा हलकेच तुला स्पर्शेल तेव्हा भान असूदेे.. तुझ्याकडे पाहणारे सारे लता;वृक्ष;नदी तुझ्याशी तादात्म्य होतात..तेही शहारतील याचं स्मरण असूदे..तुझ्याच श्वास निश्वासाच्या बंदिशीवर सारे चराचर डोलते..तुझ्याचसाठी प्राजक्तफूल बरसते..तुझ्या स्पर्शानं देठांचे रंग त्यांच्या गहिरे होतात..गुंफून फुलांना जेव्हा तू केसात माळतेस...आकाशगंगा लेवून ऊभे आसमंत भासतेस..!!
तुझाच..
पराग
Wednesday, September 4, 2013
माझे एक जुने काव्य ..
कसे समजाऊ सांग कवितेला
तिला आहे तुजकडे यायचे..
अजूनही ताजे रंग नव्हाळीचे
हे वयही नाही तिने बाहेर जायचे...