🪷🌹🪷🌹🪷🌹
मी नित्याप्रमाणे पांडुरंगाचे श्रीचरण प्रक्षाळले..ते मऊसूत वस्त्राने पुसून तयावर आपलं मस्तक ठेवलं..आणि श्रीमुखाकडे पाहिलं..सगुण साकार मुर्त मजसमोर प्रकटली.तेच सावळे सुंदर रुप.मस्तकी किरीट.मोरपीस.कंठी वैजयंती,अलंकार..
सुवर्णासम पितांबर. कटीवरील उत्तरीयाची बाजू ही हाताच्या कोप-यातून खाली विसावली आहे ती हलकेच झोके घेतेय...
अन् मुखमंडलावर वर्णन करता येणार नाही असं हास्य..
नजर भृकुटीच्यामधे विसावलेली.
माझ्या मनात कुतूहल जागृत झालं.. एक प्रश्न रेंगाळू लागला...मी तेथून वळालो.मग नित्यकर्मास लागलो..ते आटोपताच.मानसभेटीत पांडुरंगाला गाठलं.तो वृक्षातळी बसलेला होता..तिथे बसून त्याचे हात घट्ट पकडून ठेवले.पळून जायचा..त्यानं मजकडे गोड स्मित करुन पाहिलं.नजरेनंच सांगितलं जणू मी काही पळून जात नाही..
मी त्याला म्हणालो,"
संतांनी तुझी ओळख करुन दिली.तुझी बाळलीला वर्णन केली..नाथ म्हणालेत तू गोकुळात चोरी केलीस त्यामुळे पंढरपुरला पळून आलास..! मला एक प्रश्न पडलाय त्याचं उत्तर दे..!"
त्यानं मान हलवून अनुमोदन दिलं..
" तुझ्या गोकुळाच्या वर्णनात एवढा शांत कधी उभा राहिलास का रे कधी ?तू खट्याळ,उपद्व्यापी..तू युगे अठ्ठावीस वर्ष शांतपणे उभा ? तुझे हे डोळे मिटण्याचं नाटक तर नव्हे ? पण किती वर्ष चाललं.? शंकराचार्य म्हणतात हे योगपिठ आहे.तू कोणत्या योग साधनेत मग्न आहेस ? आणि महत्वाचं की तू जर आत्ममग्न असशील तर दर्शनाला येणाऱ्या भक्तांचं भान तुला असेलच कसं ? बरं त्यांची भक्ती आत्मनिवेदन तुझ्याप्रत पोहोचल कसं ? कारण तू ब्रह्मरस्वरुपी निमग्न..?"
यावर तो हसला.त्याच्या गुलाबी ओठांमागील शुभ्रदंतपंक्ती झळाळून गेल्या..
" हा तुझा एक प्रश्न आहे ?" त्यानं विचारलं..व पुन्हा खळखळून मान वर करुन हसला..मी त्याला हलवलं...
"हो..एका प्रश्नात पण तू सामावत नाहीस त्याला मी तरी काय करु ? "
मग त्यानं हसू आवरलं.माझे हात हातात घेत त्यांवर हलकेच थोपटत,सरीता जलाकडे पहात म्हणाला.," ते माझं रुप वेगळं आहे..जो रुप पाहतो त्याला कटीवर हात ठेऊन समचरणी मी उभा आहे हेच दिसेल.ते माझे सगुण रुप..पण जो स्वत:ला विसरेल त्याच्या अंतर्दृष्टीला ते " स्वरुप" आहे..!
तू म्हणलास ध्यान कोणाचे ? तर मला ध्यानाची आवश्यकताच नाही..अर्जुनाने मला युद्धिष्ठिराच्या राज्याभिषेकानंतर गीता सांगायचा आग्रह केला.तेव्हा मी स्पष्टपणें सांगितलं , मी तुला गीता पुन्हा सांगू शकत नाही, कारण मी रणांगणावर योगयुक्त अवस्थेत असतांना सांगितली होती..! त्याचंच स्वरुप पांडुरंग आहे.
आणि माझी नजर भृकुटीच्यामधे मधे असली तरीही जो भक्त अनन्यभावाने मला शरण येतो त्याच्याशी ती तादात्म होते..आणि मी विश्वाकार असल्याने तो ही विश्वाकार होऊन जातो. शरणागती हे करते..माझा प्रत्येक अनन्य भक्त पांडुरंगच होऊन जातो..!"
तो स्मित करत म्हणाला.मी भाराऊन गेलो..जे ज्ञान त्याने मला प्रदान केले.ते अद्भुत होते..मी तिथेच खाली जमिनीवर बसलो आणि त्याचे श्रीचरण माझ्या मस्तकी घेतले.....!
🪷🪷🪷🪷
- पराग
No comments:
Post a Comment