त्या सुंदर नयनरम्य परिसरातून ऋतूपर्णचे गुरु अंगावर शाल लपेटून चालले होते.सायंकाळचा समय.सूर्य अस्तास जातांना डोंगर शिखरावर केशरी सडा शिंपून गेलेला..
गुरुजी आध्यात्मिक अनुभवानेही संपन्न अन् संगीतानेही.
"गुरुजी,सप्तसुरांचा नेहमीच्या जीवनाशी संबंध आहे का ?"
" आहे,निश्चितच..,गुरुजी दीर्घ श्वास घेत म्हणाले," असं पहा..सगळ्यांच लोकांच्या मुखातून सूर निघतात पण गाणं नाही.गाणं शिकावं लागतं त्यासाठी नेमका सूर लावावा लागतो..आता सां...सां नेमका अशाच पद्धतीने लावायचा असं सांगितले जाते.जास्त वर नाही जास्त खाली नाही.तसेतच इतर स्वरही.नेमके त्याच जागी.त्यातही तीव्र,मध्यम,कोमल पद्धतीने लावले जातात..मग एकदा हे सूर पक्के झाले की मग राग विस्ताराचा कसाही आनंद घ्या.विरहण करा..!"
" पण जीवन,अध्यात्म व संगीत याची सांगड कशी ?"
" सांगतो,संत,सत्पुरुष हे नेमके जीवनाचे सूर शिकवतांत..तो पाया पक्का करुन तुम्ही जीवनाची मैफिल उभी करा असं सांगतात.सम बांधून देतात..मात्र सामान्य आसक्त भोगी माणसाला ही बंधनं वाटतात.तो म्हणतो सातच सूर काय ? आम्हाला अजून सूर हवेत.मग क,ट,त,च का नाहीत..? का तालातच रहायचं ? समेवरच का यायचं ? आम्हाला मुक्त जीवन हवंय..म्हणत ते जीवन-मैफिलीची सुरुवात जोराने तर करतात.नंतर सूर बेसूर होतो.लय बिघडते.ताल चुकतो तोल जातो..आणि तेव्हा सत्पुरुषांनी दाखवलेल्या मार्गावर चालणा-याची मैफिल जगात दाद घेत फिरत असते बेटा..!! आणि तो मृत्युशय्येवर जाईपर्यंत आनंदात नाहतो.."
" वा गुरुजी..अध्यात्मही जोडलेलं आहे याला.!"
गुरुजींनी स्मित केलं व पुढं म्हणाले, " ऋतू बेटा इतकच नाही ईश्वरच मग त्याच्या मैफिलीचा श्रोता,भोक्ता होऊन जातो..सप्तचक्रांतून कुंडलिनीची शक्ति वरपर्यंत खेळत जाते आणि तेव्हाच जीवन - संगीत मैफिलीची सांगता होते.. मी पणाचा अनंतात विलय होण्यापूर्वीचा , मौनात जाण्यापूर्वीचा श्वासांचा स्वर म्हणजे भैरवी..!! "
हे ऐकून ऋतूच्या अंगावर रोमांच उभे राहिले.त्यानं गुरुजींच्या पायावर मस्तक ठेवलं..सायंपटावरील त्या दोन आकृत्या लांबून पाहणा-याला भारत वर्षाचं प्रतिबिंबच वाटलं असतं....!!
❤️
- पराग
No comments:
Post a Comment