Sunday, January 17, 2021

प्रेम...

🌹 *प्रेम* ...
ती थोडी दु:खी होती..उदास होती..
इतकं चांगलं वागूनही पदरात उपेक्षा पडली होती...प्रेमाच्या पदरीं हे का ?..
तिनं ठरवलं आज आपल्या प्रिय दैवतासमोर ठाण मांडायचं.त्यानंच उत्तर दिलं पाहिजे.दुस-या आत्ताच्या भौतिक युगातील कुणाच्याही उत्तरानं समाधान व्हायचं नाही..
घरात कुणीही नव्हतं..तेव्हा तिनं सुंदर पूजा केली.चित्त प्रसन्न करणारी उदबत्ती लावली..अन् मानसपूजेत श्री कृष्णास आवाहन केलं...
समोर कालिंदीचा तट उजळून गेला..अन् कृष्णाची सगुण मुर्ती प्रकटली..
तिनं त्याच्या चरणी मस्तक ठेवत आत्मनिवेदन केलं.त्याची पावलं आसवांनी भिजून गेली.त्या प्राणसख्यानं स्मित केलं.तिच्या मस्तकावर स्पर्श केला अन् म्हणाला , " तुला याची उत्तरं मीरा देईल.भक्तीमति मीरा..! " तो अंतर्धान पावला..तिनं मीरेला आर्त साद घातली.अन् वीणेचा मधुर झंकार प्रकटला..कालिंदीच्या जलासमिप मीरा भजनानंदी लीन होती..हिनं धांवत जाऊन तिच्या चरणाला मिठी मारली..
मीरेनं उठवून तिला जवळ घेतलं..डोळ्यातील अश्रू पुसले..न सांगताच तिचे प्रश्न कळले.हिला आश्चर्य वाटलं..एका कदंबवृक्षातळी दोघी स्थानापन्न झाल्या...
दीर्घ श्वास घेऊन मीरेनं उत्तर दिलं..
" प्रेमाला अवयव नाही.. तरीही ते बांधतं.आश्चर्य आहे नं ? खरं प्रेम बांधत नाही.ते सगळ्यांना मुक्त करतं,मुक्त ठेवतं..प्रेम म्हणजे मुक्ती..मग दु:ख का ?
वेदना का ? आपल्या प्रिय माणसाच्या उपेक्षेची वेदना खोलवर का जावी ?...
प्रेमाच्या गर्भी दुःख नाही.प्रेमाच्या गर्भी प्रेमच नांदतं..मग जगात मात्र तसं दिसत नाही.कारण अपेक्षांचं अपत्य दुःख आहे..मी प्रेम केलं,प्रेमानं केलं त्या बदल्यांत मला काही नको पण निदान प्रेम मिळावं...ही अपेक्षा.काही नको म्हणतांना आपण प्रेमाची अपेक्षा करतो..आणि ज्या प्रेमाच्या राज्यात गणितांच्या कोष्टकांचा प्रांत नाही तो मांडतो..प्रेमाचा गणिताचा संबंध नाही.कारण इथं समिकरणं नाहीत.साम्यकरण आहे..गणितात गृहित धरावं लागतं काही..गृहित धरणं हेच नात्यांतील बंधन आहे.अपेक्षा हे बंधनही आहे अन् शापही..मी प्रेम करतो ही भाषाही अयोग्य..प्रेम येतं हा स्वभाव आहे..ह्याची जाणिवही नसणं ही ऊच्च अवस्था आहे...
तो.. 
प्रेम बाँधता नहीं ,प्रेमीको मुक्त रखता है..प्रेमी स्वयंही उस प्रेममें खुदको बाँधने चला आता है ! मेरे गिरीधर गोपालको मैने नहीं बाँधा...उन्होंने खुदको बाँधा..इसिलिए वो सगुण रुपमें विद्यमान है ...!!" 

हे ऐकून हिच्या डोळ्यांत आसवांचा डोह भरुन आला..त्यानं भक्तीमति मीरेच्या पावलांवर अभिषेक केला...
🌹🌹🌹🌹

         -  पराग

No comments:

Post a Comment