Saturday, November 6, 2021

सगुण निर्गुण

🍁🍁🍁🍁🍁
ऋषिकेशच्या पावनभूमीत मंद कलरव करत वहात असलेली गंगा..दूरच्या एका पाषाणावर बसलेली प्रसन्न वदन असलेल्या तरुणाची मुर्ती.डोळे मिटून बसलेली..
कुरळे केस पाठीवर रुळलेले.अंगावर शुभ्र वसने...
ते रुप पाहून आप्पाजी धांवतच त्याच्या दिशेनं गेले.माहित नाही पण अंतरीक ओढच एवढी वाटली की राहवलं नाही..
 आप्पाजींनी पुढे होत नमस्कार केला व आपला परिचय दिला.तरुणाचं ते सुंदर तेजस्वी रुप मोहून गेले..अन् नकळत आप्पाजींच्या डोळ्यांत पाणी आलं.त्या अनामिक तरुणाबाबत प्रेमभाव दाटून आला..त्यांना वाटून गेलं इथंच प्रश्नांची उत्तरं मिळतील..तरुणाने मी कोणी नाही,मी पर्यटक आहे,मी ईश्वराचा अज्ञ बालक असं म्हणत बोलणं टाळलं.
बराचवेळ तो तरुण मौन राहिला.मग त्यानं चालावयास प्रारंभ केला.आप्पाजीही चालत राहिले..आप्पाजी एवढंच म्हणाले ," आज माझं वय सत्तरीच्या पुढे आहे.खूप साधक भेटलेत.अभ्यास साधना केलीय काहीतरी मला मिळालंय म्हणून तुम्हाला ओळखू शकलो.तुम्हाला आता लपवता येणार नाही..माझी तळमळ खूपच वाढत चाललीय.ईश्वर साकार की निराकार ? साकार असेल तर मग तो भेटत का नाही.निराकार असेल तरीही तो भेटायचा कसा ? "
 एका पाषाणखंडावर विसावत तो तरुण म्हणाला,
 " ईश्वरेच्छा प्रमाणम् ..!"
आप्पाजी तिथं खाली बसले पण त्यानं त्यांना जवळ बसवलं..
" माझे सद्गुरु रामकृष्ण परमहंस म्हणत तो साकार ही,निराकारही त्या पलिकडीलही...त्याच्या रुपाची इति व्हायची नाही.माणसाची काय बिशाद त्याला जाणू शकेल..! पण भक्तांसाठीच तो साकार होतो..,
तो तरुण आप्पाजींकडे पहात स्मित करत म्हणाला.," कळलं ?"
" पण कसा साकार होतो ? अनुभव तर येत नाही.."आप्पाजींनी विचारलं.
" भक्तीपूर्ण अंत:करणाने व्याकूळ होऊन आळवा पाहू..त्याचं नाम घ्या.त्याचं कीर्तन करा..प्रेमानं..मग तेव्हा तो कान धारण करतो..सुगंधित पुष्प,केशर कस्तुरी,नैवेद्यासाठी तो नासिका धारण करतो,अन् तुमचं अंत:करण त्याला व्यापून उरतांच तुमचं रुप पाहण्यासाठी तो डोळे धारण करतो.ज्ञानराज माऊली हेच म्हणते तद्वत मी अचक्षूस डोळे..तुमच्या भक्ती,प्रेमानं आर्ततेनं तो हृदय धारण करतो...ते स्पंदनमय होऊ लागते.तुमचे अश्रू पाहून तो अलिंगन देऊ इच्छितो त्यासाठी त्यांस बाहू लागतात..
असा निराकार ईश्वर जो त्याला भक्तच साकार करतो.त्यानं भक्ति-प्रेमाचेच कान धारण केलेत व लोकं त्याला लौकिक गा-हाणी ऐकवतात..त्याचे कान लौकिक नाहीतच..मग म्हणतात विश्वास नाही..भक्तीच्या हांकेलाच सगुणाची साद आहे."
आप्पाजींचे डोळे भरुन आले.हात जोडून ते म्हणाले, "मग मी काय करु ?"
त्यांच्या खांद्यावर हांत ठेवत तो म्हणाला, " तुमची भक्ती पक्वं होत आलीय पण व्याकूळता हवीय..तोच हवा हाच भाव हवा..बाहेरील जगाच्या कोलाहलाच्या हांकेला आपल्या इंद्रियांची " ओ " देणं बंद झालं की वृत्ती आंतच रहाते.मनानंही ओ देऊ नये..तेव्हाच तो जाणवतो..नव्हे तोच आहे जाणवतो..मी तर नाहीच असं जाणवतं.मग साकार निराकारात लय पावतं..मग जे काही असतं ते या मुखानं सांगता येत नाही..!" 
असं म्हणत तो तरुण उठला व गतीने दिसेनासा झाला.जणू अदृश्य झाला..
आप्पाजींनी त्या पाषाणावर आपलं मस्तक ठेवलं.आपल्या आसवांनी त्याला अभिषेकात नाहू घातलं...!!

- पराग 
🌹😇❤️

No comments:

Post a Comment