Sunday, September 19, 2021
बिल्वपत्रं...!!🍁 बिल्वपत्रं...!!🍁त्या शांत अशा शिवालयातील गाभा-यात अभिषेकाचे मंत्र निनादत होते.यजमान दांपत्य अभिषेकासाठी बसलेलं..पलिकडे वयोवृद्ध पुजारी..चिदंबर.!शिवलिंग शुभ्रफुलांनी व बिल्वपत्रांनी सुभोभित होतं.चिदंबरांच्या मुखातून येणा-या धिरगंभिर मंत्राने वातावरणानंही लय बांधली होती.त्यांनी दांपत्यास डोळे मिटायला सांगितले..मग पुन्हा मंत्राचा स्वर चढा लावला..क्षणभराने चिदंबरांनी डोळे उघडले तेव्हा पाहिलं..दांपत्याचं जे रांगतं मूल होतं ते शिवपिंडीजवळ जाऊन बसलेलं.अगदी जवळ.त्यानं पिंडीवरील फुलं,बिल्वपत्रं हातांत घेतली होती.साळुंकेला घट्ट पकडून ते उभं राहू इच्छित होतं..ते पाहून चिदंबरांना क्रोध अनावर झाला.त्यांनी मूल पकटन बाजूला घेत दांपत्याना देत म्हणलं ," काय हे.मुलाला धरुन बसता येत नाही..सगळी पूजा बिघडवून टाकली यानं.काही शास्त्र असतं. सोवळं असतं..!!''दांपत्यानं कंपित होत शिवशंकराची क्षमा मागितली,चिदंबरांनाही नमस्कार केला..त्या स्त्रीचा कंठ दाटून आला." क्षमा करा गुरुजी.डोळे मिटल्यावर हा कसा तिकडे गेला कळलं नाही.."तिच्या पतीनं विचारलं " आता काय करावं लागेल ?" चिदंबर म्हणाले..," पुन्हा प्रथम पासून उपचार आले..तत्पुर्वी शिवलिंगास मला जातीने स्नान घालावे लागेल "असं म्हणत ते रागाच्या अविर्भावातच उठले.पाट उचलून दूर ठेवला. दांपत्यही उठलं.दोघांच्या डोळ्यात आसवं दाटली.घडलेल्या प्रकाराने मूल भांबावून रडत होतं..अन् कुणाच्याही नकळत एक १२,१४ वर्षाच्या बालकानं गाभा-यात प्रवेश करत जवळ येत त्या मुलाला आपल्या कडेवर घेतलं..तेजस्वी चेहरा.डोक्यावर शेंडी.कपाळावर त्रीपुंड..अंगात उपरणं..शुभ्र वस्त्रं.धोतर..दांपत्य स्तिमीत झालं.त्यांना कळेनाच मुलाला परत घ्यावं की त्या मनोहर अनुपम सौंदर्य लाभलेल्या बालकाकडेच राहू द्यावं..मुलानं बालकाकडं पाहिलं.त्याचं रडणं आपोआपच थांबलं.चेह-यावर जणू ओळखीचं हसू रेंगाळूं लागलं..मग त्या बालकानं मुलाला घट्ट जवळ घेत त्याच्या मस्तकावर अवघ्राण करीत ते दांपत्याकडं दिलं..व तो नम्रपणे नमस्कार करत चिदंबरांना म्हणाला," आजपर्यंतची आपली अखंडित सेवा त्याच्यापाशी पोहोचलीय..पण आता या उपचारापलिकडे जायला हवं नं..आपण विद्वान आहात.म्हणूनच नम्रपणे हे निवेदन आहे"चिदंबरांनी थोडसं रागावूनच विचारलं ," कोण आहेस तू ? तू एक अज्ञ बालक..तुला हे बोलायचा अधिकार दिला कुणी ? या आधी तुला इथं पाहिलं नाही..मधे लुडबूड करु नकोस.आम्हाला पुन्हा अभिषेक करायचा आहे..तुझ्याशी बोलायला मला वेळ नाही.''असं म्हणत ते पूजा साहित्य आवरुन ठेवू लागले.तो बालक स्मित करत म्हणाला ," अभिषेक संपन्न झालाय..अशी पूजा कधीच झाली नाही..अद्भुत पूजा."यांवर चिदंबरांनी शास्त्र सांगितलं.निरनिराळे दाखले दिले.नंतर पुटपुटत म्हणाले मी हे तुला का सांगत बसलोय..?यांवर त्या बालकानं ऋचा,मंत्र,श्लोक,स्तोत्रं स्पष्ट वाणीने उच्चारण करुन त्यांतील गर्भितार्थ स्पष्ट केला..त्याचा तो धिरगंभिर पण मधुर स्वर..तो मतितार्थ.,ते अद्भुत ज्ञान आजपर्यंत कधी ऐकलं नाही असं.हे ऐकून चिदंबर मौन झाले.दांपत्याला हे काय नेमकं घडतंय कळत नव्हतं..मग प्रेमानं जवळ येत चिदंबरांना तो बालक म्हणाला,"पूजोपचार,मंत्र यांची आवश्यकता आहेच.पण मतितार्थ समजून न घेता केवळ मुखोद्गत मंत्र म्हणून तो त्याच्याप्रत पोहोचत नाही असं नाही.. पण कालांतरानं पुढं जायला हवं नं..!! शिव हा ज्ञानाचं,त्यागाचं प्रतिक.जीवाने आपला अहं त्यागला नाही तर शिवस्वरुपी तो अवस्थित कसा होणार..?"असं म्हणत त्यानं ते मूल पुन्हा कडेवर घेतलं व म्हणाला " या बालकासमान अंत:करण व्हायला हवं..पहा इतकी वर्ष तुम्ही उपासना करुन क्रोध जिंकू शकला नाही..शिवाय शिवापेक्षा कर्मांनाच देवत्व दिलंत..म्हणूनच बालक व्हा चिदंबर..आपल्याच अवगुणांच्या बाबतच्या पश्चातापाने अंत:करणावर होणारा अभिषेकच खरा...पहा हे मूलसत्व,रज,तम या गुणांना हे बांधील नाही.म्हणून तीन पानं असलेलं त्रीगुणांचं प्रतिक बिल्वपत्रं शिवपिंडीवर वाहतांत.जीवानं गुणरहित होत स्वत:ला अर्पण करणं हेच खरं बिल्वपत्रं..मग शिवप्राप्ती सहज ठरलेली.जीव मुळातच शिव आहे..पण या गुणांनीच विभक्त होत ३ दिशांना बिल्वंपानांप्रमाणे विभागला जातो...हे बालक त्याच्या इच्छेनं साळुंकेपाशी गेलं..हेच ते बिल्वपत्रं..पूजा संपन्न झाली..!!"असं म्हणत त्यानं मूल दांपत्याच्या हाती दिलं.अन् तो गतीनं गाभा-या बाहेर पडला..चिदंबरांचं भान परत आलं..ते ही गतीनं त्याच्यामागं गेले..पण त्यांच्या डोळ्यादेखत त्या बालकाची मूर्त अदृष्य झाली..अन् वृद्ध चिदंबर हात जोडत जमिनीवर अक्षरश: कोसळले..." माझा शिव..माझा भोलेनाथ.. मला भेटून गेला..मी त्याला ओळखू शकलो नाही..!"चिदंबरांच्या आसवांनी जणू त्या बालकाच्या पाऊलखुणांना अभिषेक केला....!!!🍁 संतशरण पराग
Subscribe to:
Posts (Atom)